नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुने नाशिक परिसरातील मरी माता मंदिर परिसरात पूर्ववैमनस्यातून एकाने दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली. या घटनेत परिसरातील एकमेकांना लागून असलेल्या घरांनाही आग लागली होती मात्र ही बाब स्थानिकांच्या वेळीच लक्षात आल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेत दुचाकीसह घरांच्या दरवाजांचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल विजय साटोटे (रा. घर.न ३७८० कोळीवाडा,जुना कथडा टाकळीरोड) असे दुचाकीस पेटवून देणा-या संशयिताचे नाव आहे. याबाबत ओम राजू पवार (रा.कोळीवाडा,जुना कथडा) यांनी फिर्याद दिली आहे. पवार व साटोटे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याबाबत पोलीसात तक्रार करण्यात आली होती. या वादाचा राग मनात धरून साटोटे याने पवार यांची पल्सर दुचाकी रविवारी (दि.१६) मरीमाता देवी मंदिर परिसरातील चौकात पार्क केलेली असतांना ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिली.
या घटनेत बाजूला असलेल्या घरांनाही आग लागली होती. मात्र स्थानिकांनी वेळीच धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आले. या अपघातात दुचाकीसह घरांचे नुकसान झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत.