जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाजपच्या राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंडे यांनी आपल्याच सरकारवर रोष व्यक्त करत घरचा आहेर दिला. मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांकडे पाहण्याच्या सरकारच्या दृष्टीत फरक असल्याची टीका करुन त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर ओबीसी समाजाने प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषणाला बसले आहेत. या दोघांनीही पाणीदेखील सोडल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे. दरम्यान, आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आंदोलन स्थळी भेट देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. प्रा. हाके यांनी उपोषण मागे न घेतल्याने पंकजा यांनी चिंता व्यक्त केली आहे.
या संदर्भात आपल्या पोस्टमध्ये पंकजा यांनी म्हटले आहे, की प्रा. हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले असताना शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. मायबाप सरकारकडून समान न्यायाची अपेक्षा असते. प्रा. हाके यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे.