माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१-मुंबईत सध्याचा पाऊस व त्याची तीव्रता कश्यामुळे?
मजबूत अरबी समुद्रीय पश्चिमी वारे व किनारपट्टीवरील ३१०० मीटर उंचीवरचा हवेतील दक्षिणोत्तर हवेच्या कमी दाबाचा आस, च्या अस्तित्वामुळे मुळे उद्या मंगळवार, दि.१८ ते २५ जूनपर्यन्त आठवडाभर, मुंबईशहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.
२-शेष महाराष्ट्रात पाऊस स्थिती काय असेल?
दरम्यान(१८ ते २२ जून)च्या पाच दिवसात विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अशा २९ जिल्हात मात्र केवळ तुरळक ठिकाणीच वर्तवलेल्या मध्यम पावसाचीच शक्यता ही तशीच कायम आहे. त्यात बदल नाही. बदल फक्त खालील ७ जिल्ह्यात उद्या व परवा (मंगळवार व बुधवार, १८, १९ जून ला) कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर गोंदिया गडचिरोली दोन दिवस मात्र जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
३-जूनमध्येच मान्सून का थबकला?
दरवर्षी मान्सूनच्या आगमन व वाटचालीत त्याच्या प्रवाहात दिसणारा जून महिन्यातील कमकुवतपणा यावर्षीही दिसून आला आहे. अरबी समुद्रावरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर फक्त पश्चिमी बळकट मान्सूनी वारे वाहत आहे. ह्या व्यतिरिक्त मान्सूनच्या पावसासाठी विशेष अशी कोणतीही तीव्र स्वरूपातील वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रासाठी जाणवली नाही. म्हणून महाराष्ट्रात मान्सून थबकल्याचे जाणवते.
४-मान्सूनच्या आतापर्यंतच्या १९ दिवसाच्या वाटचालीत यावर्षी काही वेगळी विसंगती दिसते काय?
दरवर्षी, मान्सून प्रवाह, त्याच्या वाटचालीत, केरळ ते कर्नाटक प्रवासानंतर, जून मध्यावर सहसा, कमकुवत होवून, कर्नाटकातच मुक्काम ठोकत असे.पण ह्यावर्षी मात्र त्याने फक्त जागा बदलून, काहीसे पुढे येऊन त्याने महाराष्ट्रात मुक्काम ठोकला आहे, एव्हढाच काय तो फरक!
पण मात्र, एखाद्या दोन दिवसाच्या फरकाव्यतिरिक्त, मान्सून त्याच्या सरासरी तारखेप्रमाणे त्याच्या वाटचालीत बरोबर आहे. हेही लक्षात असू द्यावे, असे वाटते. फक्त बं. शाखा मात्र चांगलीच रेंगाळली आहे
५-महाराष्ट्रातील मान्सून व पेरणी?
सध्या कोकणात जरी जोरदार पाऊस होत असला तरी आजची स्थिती पाहता, महाराष्ट्रात अजूनही खान्देश, मराठवाडा, विदर्भात पूर्णतेने मान्सून पोहोचलेला नाही. गेल्या पाच दिवसा पासून मान्सूनच्या दोन्हीही शाखा जागेवरच खिळलेल्या दिसत आहेत. पाच(१४ ते १८ जून)दिवस ‘ पावसाचा जोर कमी होणार ‘ म्हटल्यावर महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या विवेकावर पेरणीवर झडप घातली आहे. पण अशा पेर केलेल्या व अजूनही बाठर ओलीवर पेर करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांनी मान्सूनच्या ह्या मंद वाटचालीकडे सुद्धा आवर्जून व गांभीर्याने बघावे, असे वाटते. कारण लवकरच मान्सून जर सक्रिय होणार असल्यामुळे खात्रीच्या पूर्ण ओलीवरच शेतकऱ्यांनी पेरणीचा विचार करावा, असे वाटते
६-ठिक आहे, पण मग चांगला पाऊस कधी?
वर अ. क्रं. १ मधील स्पष्टीत सध्याचा कोकणातील ७ जिल्ह्यातील मान्सूनचा जोर पाहता, येत्या पाच दिवसानंतर म्हणजे पौर्णिमेदरम्यान महाराष्ट्रासाठी नक्कीच पूरक प्रणाल्या तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनची बंगाल शाखाही पूर्व भारतात पुढे झेपावणार आहे. तर मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा सह्याद्रीवर चढाई करून, सह्याद्रीच्या पूर्वेकडील वर्षाच्छायेच्या प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता जाणवते.
त्यामुळे वरील वातावरणाच्या एकत्रित परिणामातून, पौर्णिमेनंतर म्हणजे रविवार दि. २३ जुनपासून मान्सूनची सक्रियता वाढून मुंबईसह कोकणात जोरदार ते अतिजोरदार तर खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाला सुरवात होऊ शकते, असे वाटते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.