इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरमध्येही भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या अपघातामध्ये २ मजुरांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे समजते. अपघातावेळी आरोपी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
नागपूरच्या दिघोरी नाक्याजवळ सोमवारी रात्री साडेबाराच्या आसपास ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या लोकांना या कारने चिरडले. हे लोक रस्त्यावर खेळणे विकणारे होते. ही कार तीन महिला, चार मुले व एका पुरुषांच्या अंगावर गेली. या घटनेनंतर मोठा आवाज आला. एका महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही बघून शोधमोहिम सुरु करुन काल चालकाला अटक केली.
याप्रकरणी पोलिसांनी अपघातग्रस्त कार जप्त केली असून कार चालकाला अटक केली आहे. भूषण लांजेवार असे आरोपीचे नाव आहे. या अपघातामधील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात घडला तेव्हा कारमध्ये ५ जण असल्याची माहिती आहे. त्या सर्वांनी दारू प्यायली होती असा पोलिसांना संशय असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.