नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादुटोणा करणा-या भोंदुबाबास पंचवटी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. एरंडवाडी, दत्तमंदिराच्या बाजुला कालिका मातेच्या मंदिरात भोंदुबाबा निलेश राजेंद्र थोरात हा काहीतरी जादुटोणा करण्याकरीता मानवी कवट्या गळयात टाकुन, अघोरी विदया करून लोकांना जादुटोणा, भुतपिशाच्चाचे प्रयोग करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
गुन्हेशोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना एरंडवाडी, दत्तमंदिराजवळील कालीका मंदिर येथे जावुन खात्री केली असता, या ठिकाणी प्लॅस्टिकच्या मानवी कवट्या असलेली माळ, वाळलेले लिंबु मिळून आले. थोरात याचा शोध घेऊन, पोलीस ठाणेस बोलावुन घेतले. त्यास विश्वासात घेऊन, त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने कबुली दिली की, मी गळयात कवट्यांची माळ टाकुन मला अलौकीक शक्ती प्राप्त आहे असे लोकांना भासवुन अनिष्ट व अघोरी प्रथांचा वापर करतो व इतरांना प्रवृत्त करून उत्तेजना देतो तसेच तथाकथित चमत्कांरांचा प्रयोग प्रदर्शित करून चमत्कारांचा प्रसार करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करतो.
या चौकशीनंतर पोलिसांनी निलेश राजेंद्र थोरात याचे विरूध्द पोहवा कैलास नारायण शिंदे यांचे तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाणेस गु. रजि. नं. ३७०/२०२४ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करणे करीता व त्यांचे समुळ उच्चाटन करीता अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) (१) ख (३) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/विलास पडोळकर हे करीत आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग-१, वपोनि/मधुकर कड, पंचवटी पोलीस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विलास पडोळकर, सपोउनि. संपत जाधव, पोहवा अनिल गुंबाडे, पोहवा दिपक नाईक, पोना संदिप मालसाने, पोना कैलास शिंदे, पोशिघनश्याम महाले यांनी पार पाडली आहे.