इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भिंवडीतील हिंदू संमेलनात तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा यांनी चारशेपारचा नारा प्रत्यक्षात आला असता, तर भारत हिंदू राष्ट्र झाला असता, असे वक्तव्या केले. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आ. अमोल मिटकरी यांनी भारत कधीही हिंदुराष्ट्र होऊ शकत नाही, असे म्हटले आहे.
आ. मिटकरी यांनी म्हटले की, चारशे काय पाचशे जागा जिंकल्या असत्या, तरी भारत हे हिंदू किंवा इस्लाम राष्ट्र होणार नाही, असा पलटवार केला. ते म्हणाले, की टी. राजाला हे माहिती नसावे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या या देशाचे नाव भारत म्हणजे स्वतंत्र भारत राष्ट्र हेच आहे. ४०० पार नाही, तुम्ही ५०० पार गेला असता, तरी या देशाला कुणीही हिंदूराष्ट्र घोषित करू शकत नाही.
हिंदू धर्मामध्ये ज्या भगवान श्रीकृष्णाला मानता. त्या भगवान श्रीकृष्णाने यदा यदा ही धर्मस्य, ग्लानिर्भवती भारत असा उल्लेख केला असल्याचे निदर्शनास आणून टी. राजाचा अभ्यास कच्चा आहे. त्यांनी अभ्यास करावा. कोणाचीही सत्ता आली, तरी हा देश भारत राहणार आहे, हिंदू राष्ट्र किंवा इस्लाम राष्ट्र होऊ शकणार नाही, अमोल मिटकरी यांनी सांगितले.
आमदार टी राजा सिंह यांनी वक्फ बोर्ड रद्द करावा, अशी मागणी केली. महाराष्ट्रात एक लाख एकर, तर देशात दहा लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावीत, असे ते म्हणाले.