नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पिस्तूलचा धाक दाखवित परप्रांतीय व्यावसायीकाकडून खंडणी उकळणा-या मास्टर माईंड नोकर व त्याच्या साथीदाराच्या पोलीसांनी शिर्डी येथून अटक केली आहे. या टोळीतील तीघांना यापूर्वीच अटक करण्यात आले असून मुख्यसुत्रधारासह त्याचा साथीदार घटनेपासून फरार होता. अपहरणकर्त्यांनी व्यावसायीकाच्या एटीएम कार्डचा वापर करीत ३० हजाराची रोकड बळजबरी काढून घेतली होती. तर पतीस जीवे ठार मारण्याची धमकी देत पत्नीकडून बारा लाखांची खंडणी उकळण्यात आली होती. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली.
शिव उर्फ चिकू तथा शिवा रविंद्र नेहरकर (२३ रा.नंदनवन चौक,उत्तमनगर सिडको) व शुभम नानासाहेब खरात (२५ रा.संतोषी मातानगर,सातपूर एमआयडीसी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे. राजेश कुमार गुप्ता (रा.शंभूराजे हाईटस,उपेंद्रनगर सिडको) या फॅब्रीकेशनचा व्यावसायीकाचे ४ मार्च रोजी दुपारी अपहरण झाले होते. मुळचे देवास (मध्यप्रदेश) येथील गुप्ता यांना खिडकीचे ग्रील बनवायचे असल्याचे सांगून अपहरण करण्यात आले होते. सुयोजीत गार्डन भागातील आसाराम बापू ब्रिज भागात ते ऑर्डर घेण्यासाठी आले असता चार जणांच्या टोळक्याने त्यांना इर्टिंगा कारमध्ये बळजबरीने बसवून पळवून नेले होते. वाटेत पिस्तूलचा धाक दाखवत गुप्ता यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली. त्यामुळे गुप्ता यांना मध्यप्रदेशातील देवास येथे नेण्यात आले. या ठिकाणी गुप्ता यांनी नातेवाईक व कुटूंबियाच्या माध्यमातून १२ लाख ३० हजाराची रक्कम अहरणकर्त्यांना जमवून दिली. पैसे हातात पडताच भामट्यांनी गुप्ता यांना देवास येथील बसस्थानक परिसरात सोडून देत पोबारा केला होता.
याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने प्रथम आदित्य सोनवणे नामक संशयिताच्या मुसक्या आवळल्या नंतर तुषार खैरणार व अजय प्रसाद हे संशयित पोलीसांच्या हाती लागले होते. या कारवाईत ६ लाख १६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. या प्रकरणात गुप्ता यांच्या दुकानात काम करणा-या शिव नेहरकरनेच आपल्या मित्रांच्या मदतीने हा कट रचल्याचे समोर आले होते. मात्र तो घटनेपासून पसार होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना विशेष पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित पोलीसांच्या हाती लागले. नेहरकर व खरात शिर्डी शहरात येणार असल्याची माहिती मिळताच पथक रवाना झाले होते.
शिर्डी पोलीसांच्या मदतीने दोघांच्या पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे मुसक्या आवळण्यात आल्या असून दोघांना म्हसरूळ पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णीक,उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहाय्यक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते.उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड,उपनिरीक्षक दिलीप भोई,हवालदार किशोर रोकडे,पोलीस नाईक दत्ता चकोर,रविंद्र दिघे,भुषण सोनवणे अंमलदार भगवान जाधव,अनिरूध्द येवले आदींच्या पथकाने केली.