इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हैदराबादः आंध्र प्रदेशमध्ये नवीन सरकारची शपथ घेतल्यानंतर, ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ‘वायएसआरसीपी’ अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांचे बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त केले. लोटस पॉण्ड येथील जगन मोहन रेड्डी यांच्या निवासस्थानासमोर रस्त्यावर अतिक्रमण करून घर बांधण्यात आले होते. त्यामुळे जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. अतिक्रमण आणि रस्त्याच्या बांधकामाबाबत नगरपालिकेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
जगनमोहन रेड्डी यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सुरक्षेचा विचार करून रस्त्याच्या कडेला खोली बांधण्यात आली होती. आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांच्या पराभवानंतर सुरक्षा नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी त्यांचे अवैध बांधकाम पाडले. हैदराबादमधील लोटस पॉन्डमध्ये फूटपाथ आणि रस्ता बेकायदेशीरपणे बांधण्यात आला, त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.