इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः एकीकडे नोक-यांचा शोध तरुण घेत असतांना देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ मध्ये सध्या सुमारे ८० हजार पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे या कंपनीला ही पदे भरायची असली तरी कंपनीला आवश्यक पात्रतेचे अभियंते मिळत नसल्याचे धक्कादायक कारण पुढे आले आहे. या पदाबाबत टीसीएसचे म्हणणे आहे की, कौशल्याअभावी ही पदे भरता येत नाही.
टीसीएस रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुप’ चे ‘ग्लोबल ऑपरेशन्स हेड’ अमर शेट्या यांनी म्हटले आहे, की कंपनीला ८० हजार अभियंत्यांची गरज आहे; परंतु पात्र व्यक्तींअभावी ही पदे रिक्त आहेत. ही पोकळी ठेकेदारांच्या माध्यमातून भरून काढण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीचे म्हणणे आहे, की कर्मचाऱ्यांचे कौशल्य प्रकल्पाच्या गरजेनुसार जुळत नाही. मात्र ‘टीसीएस’ने सध्या या अहवालावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
देशातील बड्या आयटी कंपन्या सध्या सुमारे दहा हजार फ्रेशर्सना नोकऱ्या देण्यास विलंब करत आहेत. यामध्ये ‘टीसीएस’चाही समावेश आहे. या फ्रेशर्सच्या जॉइनिंगची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. .