नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धारदार शस्त्र घेवून फिरणा-या दोघांना शुक्रवारी (दि.१४) पोलीसांनी जेरबंद केले. वेगवेगळया भागात करण्यात आलेल्या या कारवाईत धारदार लोखंडी गुप्ती आणि कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी सरकारवाडा व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निलेश तानाजी लहांगे (२७ रा.भगतसिंगनगर,ओझरमिग ता.निफाड) व निलेश नंदू रणमाळे (२७ रा.मोरेमळा,श्रीकृष्णनगर हनुमानवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित शस्त्रधारींची नावे आहेत. जिल्हा रूग्णालयात वावरणा-या तरूणाकडे गुप्ती असल्याची माहिती रूग्णालयीन चौकीतील कर्मचा-यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी धाव घेत निलेश लहांगे यास ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी गुप्ती आढळून आली. याबाबत अंमलदार शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.
दुसरी कारवाई भोसला मिलीटरी स्कूलच्या पारिजातनगर प्रवेश द्वार परिसरात करण्यात आली. कॉलेजच्या गेटवर उभ्या असलेल्या तरूणाकडे कोयता असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. गंगापूर पोलीसांनी धाव घेत निलेश रणमाळे याच्या मुसक्या आवळल्या असता त्यांच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला. याबाबत हवालदार मधुकर सहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक सोळसे करीत आहेत.