नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाणारे साहित्य अकादमी ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी देविदास सौदागर या युवा सहित्यकाच्या ‘उसवण’ या कादंबरी ला ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बाल साहित्यासाठी साहित्यकार व कथाकार भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ या कादंबरीला ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या वर्ष 2024 साठी युवा साहित्य आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी तीन सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे अवलंब करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे.
युवा साहित्य पुरस्कारांमध्ये 23 भाषेतील युवा साहित्यिकांना अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आले. तर, बाल साहित्य पुरस्कारांसाठी 24 भाषेतील साहित्यकांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेली आहे. युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे.
मराठी भाषेसाठी देविदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीस साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला. श्री देविदास सौदागर हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित युवा लेखक आहेत. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे मराठी साहित्य विश्वात एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण आणि शहरी जीवनातील विसंगती, संघर्ष आणि मानवी भावभावना या त्यांच्या लेखनातील मुख्य विषयांपैकी एक आहेत. ‘उसवण’ ही त्यांच्या साहित्यिक प्रवासातील एक महत्वपूर्ण कामगिरी मानली जाते. त्यांच्या लेखनात मानवी नात्यांची गुंतागुंत आणि समाजातील विविध प्रश्नांची चर्चा प्रकर्षाने आढळते. ‘उसवण’ ही कादंबरी एका ग्रामीण समाजातील कथा सांगते ज्यात कुटुंबातील नातेसंबंध, सांस्कृतिक बदल आणि सामाजिक ताणतणाव यांचे सूक्ष्म चित्रण आहे. या कादंबरीत ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनाचे बारकावे, आर्थिक संकटे आणि आधुनिकतेचे वाढते दबाव या सर्वांचे वर्णन आहे. कादंबरीतील पात्रांची विश्वसनीयता आणि कथानकाची गुंफण वाचकांना तल्लीन करते. देविदास सौदागर यांच्या शैलीत कथानकाचे नाट्यमय आणि संवेदनशील चित्रण आढळते, ज्यामुळे ‘उसवण’ ही कादंबरी वाचकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे.
मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्यिक श्री किरण गुरव डॉ. शरणकुमार लिंबाळे व श्री श्रीकांत उमरीकर यांचा समावेश होता. सुप्रसिद्ध बाल साहत्यिकार भारत सासणे यांच्या ‘ समशेर आणि भुतबंगला’ या मराठी कादंबरीला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहिर झाला. भारत जगन्नाथ सासणे हे मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिष्ठित कथाकार आहेत. त्यांचा जन्म २७ मार्च १९५१ रोजी जालना येथे झाला. साहित्य क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कथा, लेखनशैली आणि कथावस्तूंमध्ये ग्रामीण जीवनाचे विविध पैलू, सामाजिक समस्या आणि मानवी भावनांचे सूक्ष्म दर्शन घडते. त्यांच्या लेखनाची शैली वाचकांना विचारप्रवृत्त करते आणि त्यांच्या कथा मराठी साहित्य विश्वात एक विशिष्ट ठसा उमटवतात.
मराठी भाषेसाठी तीन सदस्य निर्णयाक मंडळामध्ये राजू तांबे, विजय नगरकर आणि विनोद शिरसाठ या साहित्यिकांचा समावेश होता. संस्कृतमधील युवा पुरस्कार विजेत्याची घोषणा नंतरच्या तारखेला केली जाईल, असे अकादमीने एका निवेदनात म्हटले आहे.