नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहनाच्या सायरनचा आवाज बंद करण्यास सांगितल्याने पिस्तूल रोखत दोघांनी घरावर दगडफेक केल्याची घटना रूंग्ठा टाऊन शिप भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिल देविदास चोरमारे (३४ रा.रूंग्ठा टाऊनशप फेज २ इंदिरानगर) व प्रकाश अरूण सोनवणे (३२ रा.समर्थ व्हिला अपा.माऊलीनगर पाथर्डी फाटा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत चंद्रप्रकाश विद्याधर सिंग (रा.रूंग्ठा टाऊनशिप फेज ४ वैभव कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. रूंग्ठा टाऊनशिप फेज चार समोर पार्क केलेल्या एमएच ०१ बीजी ५८८१ या वाहनाचा सायरन वाजल्याने ही घटना घडली. पहाटेच्या सुमारास अचानक सायरनच्या आवाज सुरू झाल्याने अनेकांची झोप उडाली.
सिंग दांम्पत्याने संशयितांना सायरनचा आवाज बंद करण्याचा सल्ला दिल्याने संतप्त दोघांनी परिसरात दहशत माजविली. यावेळी दांम्पत्याच्या दिशेने पिस्तूल रोखत संशयितांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली. सिंग दांम्पत्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास हवालदार डोळस करीत आहेत.
……….