नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महायुतीचे विधानपरिषद उमेदवार आ. किशोर दराडे यांच्या प्रचार नियोजनाची बैठक एस. एस. के हॉटेल नाशिक येथे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. यावेळी महायुतीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ या बैठकीला मात्र अनुपस्थितीत होते.
बैठकीला संबोधित करताना मंत्री भुसे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला, भुसे म्हणाले विजय निश्चित आहे. मात्र गाफील न राहता प्रत्येक मतदार शिक्षकांपर्यंत पोहचून मतदानाचा टक्का कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे, माघार घेतलेल्या अनेक इच्छुकांनी दराडे यांच्यासाठी माघार घेतली आहे. विरोधकांनी नाम साधर्म्य असलेल्या उमेदवार उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला याचा अर्थ आपल्या उमेदवाराची भीती विरोधकांना आहे. शिक्षकांसाठी सर्वाधिक काम करणारा आमदार म्हणून दराडे यांची ओळख आहे. शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नात गांभीर्याने लक्ष दिले असून प्रत्येकाच्या कामात लक्ष घातल्याने विजय सोपा असल्याचा विश्वास मंत्री भुसे साहेब यांनी व्यक्त केला.
भुसे पुढे म्हणाले की, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील मतदार नातेवाईक, मित्र यांच्यासमवेत चर्चा करून मतदान करून घ्यावे, आ. दराडे यांनी केलेलं काम मतदार पर्यंत पोहचविले तर मतदार नक्कीच आपल पवित्र दान आपल्याला देतील असा विश्वास देखील मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. प्रत्येकाने आपले हेवेदावे बाजूला ठेवावेत, महायुतीचे अधिकृत उमेदवार हे आ. दराडे आहेत त्यांचे नियोजन अतिशय चांगले आहे आपण स्वतः उमेदवार आहोत हे समजून कामाला लागण्याच्या सूचना देखील यावेळी केल्या.
नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महायुती तर्फे आ. किशोर दराडे हे उमेदवारी करत असून त्यांच्या प्रचारार्थ आज महायुतीच्या घटक पक्षांची बैठक घेत नियोजन करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी आ. देवयानी फरांदे, आ. सरोज अहिरे, आ. माणिकराव कोकाटे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, मा. खा. हेमंत गोडसे, प्रविण (बंटी) तिदमे आदी मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.