इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
डेहराडूनः उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत टेम्पो ट्रॅव्हलर कोसळून १० पर्यटकांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये २६ प्रवासी होते. हे सर्वजण बद्रीनाथ दर्शनासाठी जात होते, असे समजते. हे पर्यटक दिल्लीतील असल्याचे सांगण्यात आले.
अपघातानंतर पोलिस आणि राज्य आपत्ती निवारण दलाचे पथकाने बचावकार्य सुरू केले आहे. स्थानिक लोक पोलिसांना मदत करत असून जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले जात आहे. गंभीर जखमींना हेलिकॉप्टरने ऋषिकेश एम्समध्ये पाठवण्यात आले.
पोलिस अधीक्षक डॉ. विशाखा भदाणे यांनी सांगितले, की रुद्र प्रयागमधील रंटोलीजवळ एक टेम्पो ट्रॅव्हलर बस नदीत कोसळली. स्थानिक लोक, राज्य आपत्ती निवारण दल, अग्निशमन सेवा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जल पोलिस बचावकार्य करीत होते.
अपघातस्थळी रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू होते. लोकांना वाचवण्यासाठी तीन मजुरांनी नदीत उड्या घेतल्या. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. प्रवासी ज्या ठिकाणी पडले. ते ठिकाण २५० फूट खोल आहे.