नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नरफाटा परिसरात कट मारल्याच्या कारणातून बसचालकास दुचाकीस्वारांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईश्वर लक्ष्मण बांगर (रा.कारेगाव ता.पाथर्डी अ.नगर) या बसचालकाने याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. बांगर एस.टी.महामंडळाच्या संगमनेर आगारात कार्यरत असून ते गुरूवारी (दि.१४) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास अहमदनगर नाशिक या बसवर सेवा बजावत असतांना ही हाणामारी झाली.
एमएच १४ केए ९८४४ या बसमधून ते प्रवाश्याना नाशिकच्या दिशेने घेवून येत असतांना सिन्नरफाटा भागात एमएच १५ डीएक्स ८००१ या युनिकॉर्न दुचाकीवर डबलसिट आलेल्या तरूणांनी बस आडवून बांगर यांना शिवीगाळ केली. तुला गाडी चालवता येते का ? असा प्रश्न उपस्थित करीत युवकांनी बांगर यांना वाहनाखाली खेचून आम्हाला का कट मारला असे म्हणत लाखाबुक्यांनी मारहाण केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोरडे करीत आहेत.