नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन दुचाकीच्या धडकेत जखमी झालेल्या स्विगी या फुड कंपनीच्या डिलेव्हरी बॉयचा मृत्यू झाला. हा अपघात गेल्या २४ मे रोजी कॉलेजरोड भागात झाला होता. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
सौरभ भागवत बोराळ (२३ रा.गणपती मंदिराजवळ,अशोकनगर सातपुर) असे डिलेव्हरी बॉय म्हणून काम करणा-या मृत तरूणाचे नाव आहे. मुळचे बुलढाणा येथील बोराळ कुटुंबिय अशोकनगर भागात वास्तव्यास आहे. सौरभ बोराळ हा तरूण स्विगी या फुड कंपनीत डिलेव्हरी बॉय म्हणून काम करीत होता. २४ मे रोजी दुपारच्या सुमारास तो कॉलेजरोड भागातून पार्सल घेवून गंगापूर गावाच्या दिशेने जात असतांना हा अपघात झाला होता. कॉलेजरोड भागात दोन दुचाकींमध्ये अपघात झाल्याने बोराळ गंभीर जखमी झाला होता.
दुस-या दिवशी जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत त्याचे काका धर्मराज बोराळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.