नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील एकास तब्बल पन्नास लाखास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तुमच्या मोबाईल क्रमांकावरून मनी लॅण्डींग झाल्याची बतावणी करीत ही फसवणूक करण्यात आली आहे. सदर इसमास धमकावून ही रक्कम वेगवेगळया बँक आणि वॉलेट खात्यात वर्ग करण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील नामांकित व्यक्तीशी गेल्या रविवारी (दि.२) भामट्यांनी संपर्क साधला होता. विजय खन्ना व राहूल गुप्ता नावाच्या व्यक्तींनी हा संपर्क साधला होता. मुंबई सायबर क्राईममधून बोलत असल्याचे सांगून भामट्यांनी तुमच्या मोबाईल क्रमांकावरून मोठ्या रकमेची मनी लॅण्डींग झाल्याची बतावणी करीत धमकावले. यावेळी तुम्हाला यातून सुटका करावयाची असल्यास तुमच्या खात्यावर असलेली रक्कम तात्काळ आम्ही सांगू त्या बँक व वॉलेट खात्यात वर्ग करण्याचे सुचविण्यात आल्याने ही फसवणुक झाली.
दमदाटी करीत धमकविल्याने भेदरलेल्या व्यक्तीस भामट्यांनी तब्बल ४९ लाख ८९ हजार रूपयांची रक्कम त्यांनी सुचविलेल्या खात्यात वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले. २ ते १४ जून दरम्यान संशयितांनी धमकावून ही रक्कम आपल्या बँक खात्यात वर्ग केली असून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच सदर प्रतिष्ठीत व्यक्तीने पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.