मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या द्वैवार्षिक निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली. वरिष्ठ उपाध्यक्षपदी रविंद‘ माणगावे (सांगली), मुंबई विभागाच्या उपाध्यक्षपदी करूणाकर शेट्टी, मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी प्रफुल्ल मालानी विजयी झाले. कार्यकारिणी सदस्यांच्या ९० जागांपैकी ८५ जागा बिनविरोध निवड होऊन ठाणे विभागातील ५ जागांसाठी ८ उमेदवारांपैकी ५ उमेदवार विजयी झाले.
वरिष्ठ उपाध्यक्षपदी रविंद‘ माणगावे (सांगली) यांनी 1605 मते मिळवून विरोधी उमेदवार अनिल गचके (482 मते) यांना 1123 मतांनी पराभूत केले. मुंबई विभागाच्या उपाध्यक्षपदी करूणाकर शेट्टी यांनी 135 मते मिळवून विरोधी उमेदवार व मुंबई जिल्हा बँकेच्या संचालिका कविता देशमुख (55 मते) यांचा 80 मतांनी पराभव केला. मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी प्रफुल्ल मालानी यांनी १८६ मते मिळवून विरोधी उमेदवार अर्जुन गायके ( ३६ मते) यांचा पराभव केला.
बिनविरोध विजयी झालेले अन्य उपाध्यक्ष पुढील प्रमाणे पश्चिम महाराष्ट्र विभागातुन रमाकांत मालु व दिलीप गुप्ता, उत्तर महाराष्ट्र विभागातुन संजय सोनवणे व सौ. संगीता पाटील, मुंबई २ विभागातून शंकर शिंदे, कोकण विभागातुन श्रीकृष्ण परब विजयी झाले. निर्विवाद विजयानंतर ललित गांधी यांनी राज्यभरातील सभासदांना धन्यवाद दिले व गेल्या दोन वर्षात केलेल्या कार्याची पोचपावती दिल्याबद्दल हा विजय राज्यभरातील महाराष्ट्र चेंबर च्या सभासदांना अर्पण करत असल्याचे सांगितले. विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व सेक्रेटरी जनरल सुरेश घोरपडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी व सेक्रेटरी जनरल प्रभारी जे. के. पाटील यांनी काम पाहीले. निवडणूक समितिवर रमेश रांका व उत्तम शहा यांनी तर तक्रार निवारण समितिवर माजी अध्यक्ष अरविंद दोशी, अरूण ललवाणी व धनंजय दुग्गे यांनी काम पाहीले.