इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरः ई-व्हेइकल अथर कंपनीचा देशातील तिसरा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरात येणार असून तीन दिवसांपूर्वीच कंपनीने बिडकीन एमआयडीसीमध्ये शंभर एकर जागा घेतली आहे. तिथे एक हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. अथर गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूत विस्ताराचा विचार करीत होती. मात्र दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये हा प्रकल्प असल्यास उत्तर भारतात विस्ताराची संधी मोकळी होईल याचा विचार करून छत्रपती संभाजीनगरची निवड करण्यात आली.
वर्षाला दहा लाख ई-दुचाकींची निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे. तामिळनाडूतील होसूर प्रकल्पात गाड्यांची बांधणी आणि बॅटरीचे काम केले जात असून तिथे चार लाख २० हजार गाड्यांची निर्मिती होते. दरम्यान, शेअर मार्केटमध्ये अथरच्या शेअरला चांगली किंमत आहे. टीव्हीएस आणि बजाजनंतर ई-व्हेइकल निर्मितीतील अथर हा महत्त्वाचा ब्रँड आहे. २०२३-२४ मध्ये कंपनीने एक लाख आठ हजार दुचाकींची विक्री केली. ई-व्हेइकलच्या बाजारात कंपनीचा वाटा १२ टक्के असून या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर आणि परिसरात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.