नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव शहरात १२ दिवसापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास तिघा चोरट्यांनी एका सराफाचे दुकान फोडत दुकानातून ९ किलो चांदी व सोन्याचे दागिने असा ११ लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर पोलिसांनी तपास करत जळगाव येथून दोघांना अटक केली. या चोरांकडून साडे सहा किलो चांदी व काही रोख रक्कम हस्तगत केली. यातील तिसरा आरोपी हा स्थानिक असून त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी त्याला समोर आणले नसून यात आणखी मदत करणारे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.