पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला. या वेळी पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर त्याचे सोने करेन, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. अजित पवार गटाकडून याअगोदर खा. सुनील तटकरे यांचे नाव चर्चेत होते. तर कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर प्रफुल्ल पटेल असणार आहे. त्यात आता तीन खासदारांमध्ये कोणाला मंत्रीपद मिळते हे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डीजेच्या दणदणाटात, गुलाल आणि फुलांची उधळण करत सुनेत्रा यांचे स्वागत केले. केसरी वाड्यातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर सुनेत्रा यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी त्या म्हणाल्या, की मला खासदार होण्यासाठी सर्वांचे पाठबळ मिळाले. माझी निवड होण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे आभार मानते. हा सत्कार, उत्साह माझ्या पुढील कामासाठी ऊर्जा देणारा ठरणार आहे. बारामती विधानसभा मतदार संघाप्रमाणे संपूर्ण लोकसभा मतदार संघाचा विकास मला करायचा आहे, असे सुनेत्रा यांनी सांगितले.
बारामतीत झालेल्या पराभवाबद्दल आत्मचिंतन करत आहोत. जनतेने कौल मान्य आहे.येणाऱ्या निवडणुकीत असे घडणार नाही, असा विश्वास सुनेत्रा यांनी व्यक्त केला. बारामतीत लढायची कुणाचीही इच्छा असू शकते. शेवटी जनता काय करायचे ते ठरवते असे सांगून केंद्रात मंत्रिपद मिळाल्यास संधीचे सोने करणार असल्याचे त्या म्हणाल्या.