इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आषाढीच्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंडीला प्रत्येकी २० हजार रूपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी केली आहे. आषाढी एकादशी वारी पालखी सोहळा पुर्व नियोजनासाठी सह्याद्री राज्य अथितीगृहामध्ये बैठक झाली. त्यामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये वारकऱ्यांच्या प्रतिनिधींनी दौंडमधील भीमा नदीच्या किनाऱ्यावर जो कत्तलखाना होणार होता तो कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. यंदाच्या वर्षीसुद्धा वारकऱ्यांना टोल माफ करण्यात आला आहे. बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाचं वारकरी प्रतिनिधींना टाळ वाजवत स्वागत केलं.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आषाढी वारी स्वच्छ. निर्मल आणि सुरक्षित व्हावी सरकारच्या सर्व विभागांनीही चांगली तयारी केली आहे. वारीवेळी जे अपघात होतात ते टाळण्यासाठी गृह विभागाला आदेश दिलेत. वारीच्या नियोजनासाठी गतवर्षीप्रमाणेच मंत्रालायतून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त केली गेली आहे. आषाढ वारीतील वारकऱ्याचा दुर्देवाने अपघात झाल्यास गटविमा मिळावा म्हणून गतवर्षीपासून विमा योजना लागू केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
वारीसाठी जास्तीच्या एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी सक्षम आणि तज्ज्ञ यंत्रणाचा सहभाग घेण्यात येत आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, दर्शन मंडपातील हवेशीर व्यवस्था, महिलांसाठी कपडे बदलण्यासाठीची स्वतंत्र आणि पुरेशी व्यवस्था, आरोग्य सुविधा- महाआरोग्य शिबीरांचे आयोजन, रुग्णवाहिकांची पुरेशी संख्या, मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्धता या सर्व बाबींचे काटेकोर नियोजन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.