नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – थकित वसूलीसाठी वीज पुरवठा खंडीत करूनही ग्राहकांकडून परस्पर जोडणी करून घेत चोरीछुपी वीज चोरी केली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. पेठरोड आणि निलगिरीबाग भागात महावितरणने केलेल्या छापेमारीत हा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोन महिला ग्राहकांविरूध्द विद्यूत कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अनिता कुमावत (रा.कुमावतनगर,पेठरोड ) व निर्मला कमलेश श्रीवास्तव (रा. निलगिरीबाग झोपडपट्टी,पंचवटी) अशी वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलांची नावे आहेत. थकीत वसूलीसाठी महावितरणच्या वतीने गेल्या काही महिन्यात घरगुती वापराचा वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. यामध्ये दोन्ही महिला ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा न केल्याने पथकाने पाहणी केली असता वीज चोरीचा प्रकार समोर आला.
सदर ग्राहक परिसरातील लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून वीजेची चोरी करतांना मिळून आले. संबधीतांनी सुमारे एक हजार ४०२ युनिट वीजेची चोरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून याप्रकरणी सहाय्यक अभियंता चंदन पिंपळे व निखील चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरचे गुन्हे पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत.