नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वराला प्रसादाचे शुद्धीकरण की धार्मिकतेच्या नावाखाली सामाजिक विद्वेषीकरण? असा सवाल अंनिसने केला आहे. त्यांनी एक निवेदन देऊन म्हटले आहे की, धर्माच्या नावाने कायदा हातात घेणाऱ्या अशा संघटनांच्या जाहीर कार्यक्रमांची वेळीच दखल घेऊन त्यांना कायदेशीर कडक समज देणे, कायद्याच्या कचाट्यात आणणे आवश्यक आहे. हे निवेदन महाराष्ट्र अंनिसचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील व राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी दिले आहे.
या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले की, त्र्यंबकेश्वर येथील मंदिरामध्ये भाविकांकडून त्यांच्या श्रद्धास्थानाला जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या आस्थेला ठेच लागत असून प्रसादाचे पावित्र्यही अशुद्ध होत आहे. हे पावित्र्य भंग होऊ नये म्हणून प्रसाद विकणाऱ्या दुकानांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून ओम सर्टिफिकेट दिले जाणार आहे. दैवताला अर्पण केला जाणारा प्रसाद सात्विक आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर संबंधितांना सर्टिफिकेट दिले जाणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमातून झळकली. १४ जून २०२४ पासून या प्रसाद शुद्धीकरणाच्या चळवळीला प्रारंभही झाला आहे.
मंदिरा बाहेर मिळणाऱ्या प्रसादात अनेकदा विधर्मी व्यक्तींद्वारा भेसळ केल्याचे प्रकार समोर आलेले आहेत, असेही बातमीत नमूद आहे.
त्रंबकेश्वर हे अनेक धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. शिवाय सर्वच धार्मिक क्षेत्रांप्रमाणे येथेही धार्मिक क्षेत्राशी निगडित अनेक वस्तूंचा, खाद्यपदार्थांचा व्यवसाय ,व्यापार करणारी मंडळी ही विविध जाती, धर्माची आहेत. म्हणूनविधर्मी व्यक्तीने मंदिरा बाहेर प्रसादात भेसळ करण्याचे प्रकार घडले आहेत ,असे भंपक विधान करून सर्वच भाविक व व्यावसायिक यांच्या मनात संशय व संभ्रम निर्माण करण्यासारखे आहे.
लोकांच्या सुदृढआरोग्यासाठी शासनाच्या अन्नभेसळ प्रतिबंध व अन्नसुरक्षा विभागामार्फत नियमितपणे केवळ प्रसादच नव्हे तर सर्वच अन्नपदार्थांची काटेकोर तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे.त्यासाठी शासनाच्या या विभागाने सतत जागरूक राहून सर्वच धर्मांच्या धार्मिक स्थळांवरील प्रसादासह सर्व ठिकाणी असलेल्या अन्नधान्य, वस्तू ,पदार्थांची वारंवार तपासणी करायला हवी आणि दोषींवर कडक कायदेशीर करायला हवी.अशी मागणी ह्या हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारकडे किंवा ह्या अन्नभेसळ प्रतिबंध व अन्नसुरक्षा विभागाकडे लेखी स्वरूपात करायला हवी होती.
पण तसे काहीही न करता धार्मिकतेच्या नावाखाली प्रसाद शुद्धीकरणाचा बहाना करून बेकायदेशीरपणे व मनमानीप्रमाणे प्रसादाच्या शुद्धीकरणाचे सर्टिफिकेट व्यावसायिकांना वाटण्याची चळवळ सुरू करणे हे जबरदस्तीने कायदा हातात घेऊन, व्यावसायिकांच्या व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा आणणारे आणि समाजात धार्मिक द्वेष,संशय पसरवणारे कारस्थान आहे, म्हणून धर्माच्या नावाने कायदा हातात घेणाऱ्या अशा संघटनांच्या जाहीर कार्यक्रमांची वेळीच दखल घेऊन त्यांना कायदेशीर कडक समज देणे, कायद्याच्या कचाट्यात आणणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र अंनिसचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील व राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी एका जाहीर निवेदनात म्हटलेले आहे.