नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आगामी खरीप हंगामात खते, बियाणे आणि कीटकनाशके योग्य वेळेत उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. २०२४ च्या खरीप हंगामासाठी तयारीचा आढावा घेण्यासाठी कृषी भवनात आयोजित बैठकीत चौहान यांनी पिकांसाठी आवश्यक दर्जेदार साहित्याचा योग्य वेळेत पुरवठा करण्याचे निर्देश विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
पुरवठा साखळीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आला तर पेरणीला उशीर होतो आणि त्याचा दुष्परिणाम पिकाच्या उत्पादनावर दिसून येतो हे लक्षात घेऊन अडथळे टाळावेत, असे ते म्हणाले. सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या आणि शेतकऱ्यांना कष्टदायक परिस्थितीतून जावे लागू नये यासाठी सर्व प्रकारे उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या. नैऋत्य मौसमी पाऊस यंदा सरासरीपेक्षा अधिक होणार असल्याच्या अंदाजाबद्दल चौहान यांनी आनंद व्यक्त केला. खते विभाग, केंद्रीय जल आयोग आणि भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी आपापल्या विभागाबद्दल सादरीकरण केले. कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज अहुजा व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरीप हंगामाच्या सज्जतेविषयक माहिती केंद्रीय मंत्र्यांना दिली.