नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भारत निवडणूक आयोगाकडून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, २६ जून रोजी मतदान होणार आहे. या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक मतदार मर्यादित स्वरूपात असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा जाहीर केली आहे, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 चे कलम 135 (ब) नुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याची तरतूद आहे. मात्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार मर्यादित स्वरूपात असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता सामान्य प्रशासन विभागाकडील दि. 23.06.2011 रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षक मतदारांसाठी मतदानाकरिता विशेष नैमित्तिक रजा जाहीर केली असून, ही रजा शिक्षक मतदारांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. मतदारांना सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील 25,302 शिक्षक मतदार असून त्यांचेसाठी जिल्ह्यात 29 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी केलेल्या शिक्षक मतदारांनी मतदानाकरिता मिळालेल्या या विशेष नैमित्तिक रजा सवलतीचा लाभ घेऊन अवश्य मतदान करावे, असे आवाहन श्री. शर्मा यांनी केले आहे.