नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया ३ जून, २०२४ पासून सुरु करण्यात आलेली असुन दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ३० जून, २०२४ पर्यत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक आर. एस. मुंडासे यांनी केले आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरुपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवुन झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण ८५ व्यवसाय उपलब्ध असुन १ लाख ५४ हजार ९३२ एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणा-या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत ६५२ नवीन अभ्यासक्रमाच्या तुकडया सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहाकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह रु.५००/- विद्यावेतन देण्यात येते. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे.
दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, आयटीआय मधुन व्यावसायिक शिक्षण पूर्ण करुन त्वरीत रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावेत, मुंडासे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.