नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील बेकायदा गुटखा विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसले असून, गुरूवारी (दि.१३) दोन ठिकाणी छापे टाकत एफडीए पथकाने चार लाख रूपये किमतीचा गुटख्याचा साठा हस्तगत केला आहे. ही कारवाई पखालरोड आणि अंबड लिक रोड भागातील डीजीपीनगर येथे करण्यात आली. याप्रकरणी मुंबईनाका व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून एकास अटक करण्यात आली आहे.
राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री रोखण्यासाठी बेकायदा साठा करून ठेवणा-यांसह विक्रेत्यांना रडारवर घेण्यात आले आहे. एफडीएच्या सुवर्णा महाले यांनी गुरूवारी पखालरोड भागात छापा टाकून धिरज रमेश कोठावदे (४३ रा.व्यंकटेश पार्क आयप्पा मंदिराशेजारी) या गुटखा विक्रेत्यास बेड्या ठोकल्या. संशयिताने सोसायटीच्या पार्किंगमधील खोलीत विविध प्रकारची सुगंधी तंबाखू आणि पान मसालाचा साठा करून ठेवला होता. या कारवाई सुमारे २ लाख १२ हजार ७२६ रूपये किमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी श्रीमती महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.
दुसरी कारवाई डीजीपीनगर २ येथील गुलमोहर कॉलनी भागात करण्यात आली. सुधीर विष्णू सोनजे (५५ रा.श्री निकेतन पार्क) या विक्रेत्याच्या घरझडतीत विविध प्रकारचा सुमारे १ लाख ७२ हजार १२३ रूपये किमतीचा गुटख्याचा साठा आढळून आला. याप्रकरणी एफडीएच्या सायली पटवर्धन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक घुनावत करीत आहेत.