इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेत एकाच वेळी दोन दोन महापालिका आयुक्त कारभार करीत असल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला. हे घडण्यामागे काहीसे तांत्रिक कारण असले तरी त्यात प्रशासनाचा भोंगळ कारभारही समोर आला. तत्काळ निर्णय न घेतल्यामुळे हा प्रकार इंचलकरंजीत बघायला मिळाला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची अन्यत्र बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र दिवटे यांनी ‘मॅट’मधून बदलीला स्थगिती आणली. त्यांची बदली रद्द झाल्याने ते पदभार स्वीकारायला आले होते. परंतु पाटील यांना अन्यत्र कोठे जायचे हे सांगितले नव्हते. पाटील यांनी पदभार सांभाळून कामही सुरू केले होते. आयुक्त केबिनमध्ये दिवटे आणि पाटील यांनी दोघांनी पदभार घेऊन काम सुरू केले. वरिष्ठ पातळीवरून काहीच सूचना नसल्याने तसेच कुठे हजर व्हायचे, याबाबत निर्देश नसल्याने पाटील पदभार सोडत नव्हत्या.
दोन्ही आयुक्तांमध्ये पदभार घेण्यावरून वादावादी झाली. दोघांनीही एकमेकांशेजारी खुर्च्या लावून कामकाज सुरू केले. एक तासानंतर दिवटे यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर पाटील यांनी पदभार सोडला. वरिष्ठांचा फोन आल्यानंतर त्यांनी महापालिकेतून काढता पाय घेतला. तोपर्यंत दिवटे आणि पाटील यांच्यात चांगलीच वादावादी झाली होती.
दरम्यान, ‘मॅट’ने पाटील यांच्या नियुक्तीला स्थगिती देऊन दिवटे यांची निवड कायम ठेवली होती. दिवटे हे गेल्या वर्षापासून आयुक्त आणि प्रशासक होते. त्यांची मुदतीआधीच बदली करून त्यांच्या जागी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली; मात्र दोन वर्ष आधीच बदली झाल्याने दिवटे मॅटमध्ये गेले होते. तिथे त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली.