नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे. आपली प्रकरणे विशेष लोकअदालतीत तडजोडीने मिटावीत, अशी इच्छा असलेल्या पक्षकारांनी पूर्व बोलणी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी सेवा सदन, मारूती मंदिरामागे, जिल्हा न्यायालय आवार, जुने सी.बी.एस.जवळ नाशिक येथे संपर्क साधावा, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव मिलिंद बुराडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
नाशिक येथील पक्षकारांच्या सर्वोच्च न्यायालयातील तडजोड प्रकरणांमध्ये तडजोडयोग्य प्रकरणांमध्ये तडजोडीची पूर्व बोलणी करण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. डी. जगमलानी यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. यासाठी संबंधित पक्षकार प्रत्यक्ष अथवा आभासी पद्धतीने सहभागी होवू शकतात.
विशेष लोकअदालतीमध्ये झालेल्या निवाड्याविरूद्ध अपील करता येत नाही. प्रलंबित प्रकरणात भरलेली कोर्ट शुल्काची रक्कम शंभर टक्के परत मिळते. पक्षकाराच्या नातेसंबंधात कटुता दूर होवून जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. पैसा, वेळ व श्रमाची बचत होते. लोकन्यायालयाच्या माध्यमातून सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो. त्यामुळे पक्षकारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असेही प्रसिद्धीपत्रकात कळविण्यात आले आहे.