नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रभाग २४ मध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, बडदेनगरचा खचलेला रस्ता दुरुस्त करावा, खड्डे बुजवावेत, या मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने महापालिका आयुक्तांना शुक्रवारी, १४ जून रोजी दिले. या कामांमध्ये दुर्लक्ष व हलगर्जीपणा झाल्यामुळे अपघात होवून जीवितहानी झाल्यास महापालिकेचे संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रभाग २४ मध्ये अनेक भागात पावसाळी गटार नाही, त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी घरात जात असल्याने गेल्या सात वर्षांपासून रहिवाशी आंदोलन करत आहेत, तरीही दखल घेतली जात नाही. पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, बडदेनगरसह इतर ठिकाणी खचलेले रस्ते दुरुस्त करावेत, ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी अपघात होवून जीवितहानी झाली तर दुर्लक्ष व हलगर्जीपणा केल्याप्रकरणी संबंधित महापालिका अधिकारी व ठेकेदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची दखल घेवून उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, धवल खैरनार, संगीता देशमुख, विठ्ठलराव देवरे, बापूराव पाटील, बाळासाहेब देशमुख, दिलीप निकम, निलेश ठाकूर, मनोज वाणी, सतीश मणिआर, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, बन्सीलाल पाटील, बाळासाहेब राऊतराय, आनंदराव तिडके, भारती देशमुख, मीना टकले, वंदना पाटील, दीपक दुट्टे, प्रथमेश पाटील आदींसह रहिवाशांनी दिला आहे.