इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नीट परिक्षेचा घोटाळा देशभर चर्चेत असतांना आता बुलढाणा जिल्ह्यातील संगणक टंकलेखन परीक्षेत घोटाळयाने खळबळ निर्माण केली आहे. चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु असलेला हा गैरप्रकार राज्य शिक्षण मंडळानेच उघडकीस आणला आहे. ऑनलाईन असलेली परीक्षा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर न जाता बाहेरून देत असल्यामुळे जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक टंकलेखन परीक्षा सुरु असून बुलढाणा जिल्ह्यातील हा प्रकार समोर आला आहे. इतर ठिकाणी नेमकं काय घडलं असेल याचा शोध आता घेतला जात आहे. गुरुवारी ही परीक्षा सुरू असताना चिखली येथील अनुराधा इंजीनियरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात २२ विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना परीक्षा केंद्रात मात्र १४ विद्यार्थी परीक्षा देत होते. त्यामुळे हा घोटाळा समोर आला.
असा उघड झाला घोटाळा
पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष २२ विद्यार्थ्यांनी अॅक्सेस घेतल्याचं दिसून आले तर परीक्षा केंद्रावर १४ विद्यार्थी होते. त्यामुळे शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनी परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखांना व्हिडिओ कॉलद्वारे परीक्षा केंद्रातील विद्यार्थी दाखवण्यास सांगितले. मात्र त्यावेळी परीक्षा केंद्रावर फक्त चौदाच विद्यार्थी परीक्षा देत होते. इतर आठ विद्यार्थी दिसत नसल्यामुळे हा घोटाळा समोर आला.
सातही परीक्षा केंद्रावर असाच प्रकार
आठ विद्यार्थी बाहेरून परीक्षेला जॉईन कसे झाले? त्यामुळे बुलढाणा जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ हे केंद्र गाठून हा सगळा गैरप्रकार उघडकीस आणला. बुलढाणा जिल्ह्यातील सातही परीक्षा केंद्रावर अशाच प्रकारे हा घोटाळा सुरू होता. त्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली.