मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मराठी मतं मिळाली नाहीत अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर मनसेतून शिवसेना ठाकरे गटात आलेले कीर्तिकुमार शिंदे यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्टमधून या टीकेला उत्तर दिले आहे.
त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मनसेने नरेंद्र मोदी यांना विरोध केला होता तेव्हा आपण, आम्ही मराठी नव्हतो का?
श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा शिवसेना पक्ष, खासदार आमदार नगरसेवक आणि निशाणी असं सगळं चोरीला गेलेलं असतानाही लोकसभा निवडणुकीच्या परीक्षेत ड्रॉप घेतला नाही. त्यांनी भाजप- नरेंद्र मोदी- अमित शहा यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आणि तब्बल ९ खासदार निवडून आणण्याचा पराक्रम केला, ज्याबद्दल महाराष्ट्रात नाही, अवघ्या देशात त्यांचं कौतुक होत आहे. मराठीजनांनी (मग ते कोणत्याही जातीधर्माचे असोत) त्यांना भरभरून मतं दिली. अगदी मुस्लिम- ख्रिश्चन- बौद्ध आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनीही ‘मशाल’ला मतदान केलं. “उद्धवजींच्या शिवसेनेला मराठी मतं मिळाली नाहीत” असं जे म्हणत आहेत, ते स्वतःची फसवणूक आणि मराठीजनांची करमणूक करत आहेत, असं अत्यंत खेदाने म्हणावं लागेल.
या पोस्टमध्ये शिंदे यांनी अनिल देसाई यांच्या विजयाच्या मिरवणुकीचा फोटो सोबत जोडत म्हटले आही की यात जल्लोष करणारे मराठी नाहीत?
गेली तीन दशकं अनिल देसाई, अरविंद सावंत यांनी स्थानीय लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून मराठीजनांसाठी भरीव काम केलं. त्यांना मराठी मतं मिळाली नाहीत, हे कुणाला पटेल का?)