इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जयपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले, की भाजप अहंकारी झाला आहे, म्हणून प्रभू रामाने त्यांना २४१ वर थांबवले.
मोहन भागवत यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले इंद्रेश कुमार जयपूरजवळील कानोटा येथे आयोजित ‘रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजा सोहळ्यात’ बोलत होते. इंद्रेश कुमार यांनी कोणाचेही नाव घेतले नाही; मात्र निवडणुकीच्या निकालावरून त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो, असे ते म्हणाले. तो अहंकारी झाला होता, हे त्यांचे वक्तव्य भाजपकडे अंगुलीनिर्देश करणारे होते.
ते म्हणाले, पक्षाने आधी भक्ती दाखवली आणि मग अहंकारी झाला. भगवान रामांनी त्यांना २४१ वर थांबवले; पण त्यांना सर्वात मोठा पक्ष बनवले. ज्यांचा भगवान रामावर विश्वास नाही, त्यांना २३४ वर थांबवण्यात आले. लोकशाहीत रामराज्याचे संविधान पाहा, असा सल्ला त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, की त्यांनी रामाची पूजा केली; पण हळूहळू अहंकारी झाले. सर्वात मोठा पक्ष बनला, पण जी मते मिळायला हवी होती ती प्रभू रामाने अहंकारामुळे थांबवली. रामाला विरोध करणाऱ्यांना सत्ता मिळू शकली नाही. हे सर्व मिळून दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
इंद्रेश कुमार म्हणाले, की देवाचा न्याय खरा आणि आनंददायक आहे. जे त्याची उपासना करतात त्यांनी नम्र असले पाहिजे आणि जे त्याला विरोध करतात त्यांच्याशी देव स्वतः व्यवहार करतो. ते म्हणाले की, प्रभू राम भेदभाव किंवा शिक्षा करत नाहीत. राम सर्वांना न्याय देतो. प्रभू राम नेहमी न्यायी होते. एकीकडे त्याने प्रजेचे रक्षण केले, तर दुसरीकडे रावणाचे भले केले.