इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2024 चे भाजपा उमेदवार किरण शेलार यांच्या प्रचारार्थ रंगशारदा सभागृह, वांद्रे येथे आयोजित भाजपा विजय संकल्प मेळाव्यास उपस्थित राहून जमलेल्या जनसमुदयास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले.
यावेळी ते म्हणाले की, भाजपाला किरण शेलार यांच्यासारखा तरुण, तडफदार, संघर्षातून उभा राहिलेला युवा उमेदवार मिळाला आहे. मुंबईच्या बीडीडी चाळीत जन्मलेल्या किरण शेलार यांना सामान्य मुंबईकरांच्या दुःखाची आणि त्यांच्या संवेदनांची जाणीव आहे. त्यांच्या विचारांची मांडणी ही अतिशय पक्की आहे. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रवादाच्या विचारातून त्यांची जडणघडण झाली आहे. विविध जबाबदाऱ्या सांभाळत पत्रकारिता क्षेत्रात आपले विचार त्यांनी निर्भीडपणे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले आहेत. मला विश्वास आहे की, किरण शेलार यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भाजपा कार्यकर्ते नक्कीच पाठींबा देतील.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांना खोटा अपप्रचार करण्यात यश मिळाल्याने त्याचा फटका अर्थात महायुतीला बसला. परंतु श्रध्येय अटलजी यांनी सांगितल्याप्रमाणे “क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत मैं, संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही” या मार्गावर चालणारे आम्ही आहोत.
मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की, पंडित नेहरूजी नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे हे मोदीजी आहेत. या निवडणुकीत संपूर्ण इंडी आघाडीला मिळालेल्या जागांच्या तुलनेत एकट्या भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. महायुतीची लढाई ही एकट्या इंडी आघाडी सोबत नसून खोट्या अपप्रचारासोबत होती. हा अपप्रचार सतत चालणार नाही ‘We Will Bounce Back’. आम्ही महाराष्ट्रात पुन्हा ताकदीने विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवून पालिकेवर भगवा झेंडा नक्कीच फडकवणार.
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2024 ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे मतदार नोंदणी. या मतदारसंघात सर्वाधिक मतदार नोंदणी भाजपाने केली आहे. त्यामुळे या नोंदणीतील मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्याचे काम आपल्याला जबाबदारीने आणि पुढाकाराने करायचे आहे. या निवडणुकीत आपल्याला अपप्रचारावर विजय मिळवून मुंबईमध्ये एक नवीन वाटचाल सुरु करायची आहे. तसेच भाजपा सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून आणू शकतो, हे देखील आपल्याला दाखवून द्यायचे आहे. मला खात्री आहे की, मुंबई पदवीधर मतदारसंघाचा आमदार हा भाजपाचाच असेल.
या मेळाव्यास मंत्री मंगलप्रभात लोढा जी, मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार व मान्यवर उपस्थित होते.