इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः विजय झाला तर संघामुळे आणि पराजय झाला तर अजित पवारांमुळे का? असा प्रश्न अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संघाला विचारला आहे. संघाच्या समर्थक नियतकालिकामध्ये छापून आलेल्या लेखामुळे महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. दोन दिवसांनंतर अजित पवार गटाच्या वतीने संघावर टीका करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पवार यांना सोबत घेतल्यामुळेच मतदार नाराज असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघाचे समर्थन करणाऱ्या एका नियतकालिकामध्ये प्रकाशित लेखात लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या भाजपच्या पराभवला अजित पवार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावरुन आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
चव्हाण यांनी एका पोस्टच्या माध्यमातून अजित पवार गटाची भूमिका स्पष्ट केली. अजित पवारांवरील आरोप फेटाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, की भारतीय जनता पक्षाचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजितदादांमुळे झाला का? महाराष्ट्राच्या जनतेचा कौल, रोष समजून घ्या.. लिहता आणि बोलता आम्हाला पण येते.
दरम्यान, महाराष्ट्रात अजितदादांमुळे, काँग्रेसच्या नेत्यांच्या भाजपतील प्रवेशामुळे भाजपचा पराभव झाला हे मान्य आहे, अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया व्यक्त करताना देशात कुणामुळे पराभव झाला असा सवाल केला आहे.