नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने इयत्ता 10 वी व 12 वीच्या शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या काळात मासिक पाळी आरोग्य – स्वच्छता व्यवस्थापनाबाबत कृतीशील उपाययोजना जाहीर केल्या आहेत. विद्यार्थिनींचे आरोग्य, प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि संबंधित कारणांमुळे त्यांच्या शैक्षणिक यशावर परिणाम होऊ नये हा याचा उद्देश आहे. परीक्षेच्या कालावधीत मासिक पाळीदरम्यान लागणाऱ्या आरोग्यविषयक साहित्याचा पुरेसा पुरवठा करण्याबाबत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समितीच्या सर्व शाळांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मासिक पाळीविषयक समस्या विद्यार्थिनींचे एकूण आरोग्य आणि शैक्षणिक कामगिरीच्या आड येऊ नयेत, या हेतूने शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने 10 वी व 12 वीच्या परीक्षांदरम्यान शाळांमध्ये मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापनाला प्राधान्य दिले आहे.
या संदर्भातील उल्लेखनीय उपक्रम पुढीलप्रमाणे –
सॅनिटरी पॅडच्या पुरवठ्याची तरतूद – 10 वी व 12 वीच्या परीक्षा केंद्रांवर सॅनिटरी पॅड विनामूल्य उपलब्ध करून दिली जावीत. परीक्षेच्या दरम्यान गरज भासल्यास विद्यार्थिनींना ती सहज मिळावीत, असे नियोजन असावे.
रेस्टरूम विराम-मासिक पाळीदरम्यान आवश्यक असल्यास रेस्टरूम/ स्वच्छतागृहासाठी विराम घेण्याची परवानगी विद्यार्थिनींना दिली जावी.
संवेदनशीलता व जागरूकता वाढीसाठी कार्यक्रम – राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी मासिक पाळी दरम्यान आरोग्याच्या व्यवस्थापनाविषयी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गात जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करावे. यामुळे मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज, अंधश्रद्धा दूर करण्यास आणि शाळेत विद्यार्थिनींना या बाबतीत सोयीस्कर वातावरण निर्माण करण्यास मदत होईल.
परीक्षांच्या काळात मासिक पाळीविषयक आरोग्याच्या मुद्याकडे लक्ष पुरवत शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने विद्यार्थिनींना मासिक पाळीसंदर्भातल्या आवश्यकतांच्या संदर्भात प्रतिष्ठेची व आदराची वागणूक देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यांतून विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात त्यांची संपूर्ण शैक्षणिक क्षमता योग्य प्रकारे वापरता येईल.