इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीची निवडणुक यंदा देशात गाजली, दिल्ली, केरळ, हैदराबाद येथील वृत्तपत्रात बारामतीची निवडणूक गाजत होती. काही गावात लोकांवर दडपण होते. काही लोक प्रचारास सुरुवातीला आले; पण नंतर गायब झाले. माझ्यासोबत अनेकजण असतात; परंतु ते निवडणुकीत दिसले नाहीत. एकप्रकारे दबावाचे वातावरण निवडणुकीत होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला.
पवार यांनी बारामती परिसरातील सुपे, उंडेवाडी भागात दुष्काळ दौरा केला त्यावेळी ते ते म्हणाले, की या देशात राजकीय लोकापेक्षा समान्य जनतेला लोकशाहीबद्दल आस्था जादा आहे. जनता कधी आपले मत दाखवत नाही; परंतु ते ईव्हीएममधून दाखवतात. सुप्रिया सुळे यांना ज्याप्रकारे मतदान झाले, त्यातून जनतेच्या मनात काय हे दिसले. मला अनेक निवेदने दुष्काळी भागातून आली. पुरेसे पाणी मिळण्य़ाची मागणी आहे.
शेतकऱ्यांना परदेशात कांदा निर्यात करण्यासाठी ४० रुपये किलो कर लावण्यात आला. दुसऱ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या कांदा निर्यातीवर कर नाही; परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कर आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार आपल्या हातात हवे. त्यामुळे आम्ही ठरवले चार महिन्यांनी विधानसभा निवडणुक असून सरकार ताब्यात घ्यायचे आपण ठरवले आहे. दुधाचा भाव, पिकांना हमीभाव, कांदा निर्यात प्रोत्साहन हे विषय मार्गी लावू, असे पवार यांनी सांगितले.