इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांची बिनविरोध निवड झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी सकाळी अर्ज दाखल केला. त्यानंतर कोणीही अर्ज दाखल केला नसल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे आता बारामतीला तीन खासदार मिळणार आहे. याअगोदर राज्यसभेवर शरद पवार आहे, तर लोकसभेतून सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातून सुनेत्रा या नुकत्याच पराभूत झाल्या. त्यामुळे त्यांची वर्णी राज्यसभेवर लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेवर सस्पेन्स होता. तो आज संपला. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ नाराज झाल्याचे बोलले जात होते. पण, ते उमेदवारी अर्ज भरतांना आज सोबत होते.
शरद पवार गटाच्या अपात्रतेच्या याचिकेमुळे पटेल यांनी २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते दुसऱ्या जागेवर निवडून आले. चार वर्षे कार्यकाळ उरलेल्या पटेल यांच्या जुन्या जागेवर ही पोटनिवडणूक झाली. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यासाठी आता सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर एकमेवक अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.
राज्यसभेच्या या जागेसाठी आमदारांच्या मतदानातून २५ जूनला निवडणूक होणार होती. सध्या महायुतीकडे २०० हून अधिक आमदारांचे पाठबळ असल्यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजयी होणार हे निश्चित होते. दरम्यान, अजितदादा गटाचा लोकसभेत एक व राज्यसभेत एक असे दोन खासदार आहेत. पोटनिवडणूक जिंकल्यानंतर त्यांचे राज्यसभेत दोन खासदार झाले आहे. उदयनराजेंसाठी अजितदादा गटाने साताऱ्याची जागा सोडली. उदयनराजे यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर ती जागा राष्ट्रवादीला मिळेल. अजितदादांनी सातारा जिल्ह्यातील नेत्याला तिथे उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर दादांचे राज्यसभेत तीन व लोकसभेत एक असे चार खासदार होतील. या बळावर केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदावर त्यांनी दावा केला आहे.