मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज आयसीडीएस आयुक्त कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अन्य निमंत्रित संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या व सकारात्मक वातावरणात पार पडली. बैठकीत खालील विषयांवर चर्चा होऊन कार्यवाही करण्याचे मान्य करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिली आहे.
- सेविका व मदतनिसांना प्रत्येकी १०,००० मानधन वाढ प्रस्तावित करावी या मागणीवर त्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले.
- मासिक पेन्शन बाबत योजनेचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला असून तो निर्णय अंतिम टप्प्यात आहे.
- ग्रॅच्युइटी बाबत निर्णय घेण्यात आला असून निधी मंजूर करण्यात येईल
-२०२२च्या आधी नियुक्त १०वी पास मदतनिसांची सेविका पदी थेट नियुक्ती करण्यात येईल.
-सुपरवायझर पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादेचे निकष बदलण्यासाठी उच्च न्यायालयाचा आधार घ्यावा लागेल.
- मुंबई सारख्या महानगरात अंगणवाडीचे भाडे किमान ४००० करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल.
- सर्व थकित एकरकमी सेवा समाप्ती लाभाच्या रकमा ३ महिन्यांच्या आत दिल्या जातील.
-मोबाईल व पोषण ट्रॅकर ॲपचे प्रशिक्षण दिले जाईल. रिचार्जची रक्कम वाढविण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल. - नागरी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ८ किमी पेक्षा जास्त अंतरावर बोलावल्यास टीएडीए देण्याचा आदेश काढला जाईल.
- नागरी प्रकल्पात रुपांतरीत आदिवासी लाभार्थ्यांना पेसा अंतर्गत अमृत आहार योजना लागू करण्याबाबत आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा केला जाईल. दुर्गम भागाचा १०० व ७५ रुपये भत्ता पुन्हा सुरू करण्यात येईल.
- ५ व १० वर्षांवर मिळणारी केंद्रीय वाढ रु ३१ व ३२ तसेच १०, २०, ३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी ३,४,५ % वाढ फरकासहित देण्यात येईल.
- आहाराबाबतच्या तक्रारी सोडवल्या जातील तसेच आहार व इंधनाचे दर वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल.
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय रजा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल.
- अंगणवाडीचे सर्व साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहचवण्याच्या मागणीवर विचार केला जाईल.
बैठकीत कृती समितीच्या वतीने कॉ एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, दत्ता देशमुख, राजेंद्र बावके, संगीता कांबळे, राजेश सिंग, निलेश दातखिळे सहभागी झाले होते. प्रशासनाच्या वतीने माननीय उपायुक्त विजय क्षीरसागर, संगीता लोंढे, श्री काकडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
उपरोक्त प्रस्तावित विषय व मानधनवाढीची मागणी मार्गी लागण्यासाठी शासनावर दबाव आणणे आवश्यक आहे व त्यासाठी ठरल्याप्रमाणे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आझाद मैदानावर जोरदार शक्तिप्रदर्शन करणे आवश्यक आहे असा निर्णय बैठकीनंतर झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सर्व जिल्ह्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीने केले आहे.