नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आडगाव ट्रक टर्मिनलमध्ये वाहतूकदारांना पर्यायी व्यवस्था न करताच याठिकाणी सुरू असलेल्या इलेक्ट्रिकल बस डेपो व श्वान निर्बीजीकरण केंद्रामुळे वाहतूकदारांना प्रचंड गैरसोय होत असल्याने आज संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका आडगाव ट्रक टर्मिनल येथे सुरू असलेले बस डेपोचे काम बंद पाडले.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने वारंवार मागण्या करून देखील कामे होत नसल्याने आज नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आज संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, नाशिक मनपा आयुक्त व नाशिक औद्योगिक वसाहतीचे प्रादेशिक अधिकारी यांना विविध मागणीचे निवेदन देण्यात आले. तसेच या मागण्या १५ दिवसांत मान्य न झाल्यास ४ जुलै २०२४ रोजी संघटनेच्या वतीने महा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्याध्यक्ष पी.एम.सैनी यांच्यासह पदाधिकारी सुभाष जांगडा, महेंद्रसिंग राजपुत, संजू तोडी, रामभाऊ सूर्यवंशी, रमेश शर्मा, राजेश शर्मा, इंद्रजित चड्डा, दलजीत मेहता, नरेश बन्सल, हनुमान सिंग, महावीर शर्मा ,कृष्णा बेनिवाल, सदाशिव पवार, सजन राजपुरोहित, सुनिल जांगडा, हसरत शेख, ईश्वर सोनवणे, संजू जैन, आनंद राजपुत, अमित शर्मा, प्रशांत वशिष्ठ, रविकांत शर्मा, रंदिर सिंग यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक शहरातील वाहतुकीचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने व अपघात कमी करण्याच्या दृष्टीने आडगाव नाका येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल विकसित करण्यात आले आहे. या ट्रक टर्मिनल मध्ये विविध सोयी सुविधा निर्माण करून येथे सारथी सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात यावी यासाठी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन अनेक वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र या ठिकाणी ट्रक टर्मिनल विकसित न करता या जागेत नाशिक महानगरपालिकेच्या वतीने इलेक्ट्रिक चार्जिंग बस डेपो साकारण्यात येत आहे.
प्रामुख्याने हा बस डेपो शहरात असणं आवश्यक होत परंतु शहरा पासुन दहा किलो मिटर बाहेर बस डेपो नेऊन चार्जिंग साठी जवळपास ये जा करून वीस किलो मिटर अंतर नाहक नुकसान होणार आहे त्यात शहरातील दोन फेरे होऊ शकले असते हे होणारे नुकसान महापालिकेचेच असल्याचे म्हटले आहे.
आडगाव येथील या ट्रक टर्मिनल मध्ये विकसित करण्यात येत असलेल्या बस डेपोला संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आल्यानंतर महापालिकेने स्वतंत्र पाच जागेत ट्रक टर्मिनल विकसित करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र या आश्वासनाचा महापालिकेला विसर पडलेला दिसतोय.पावसाळा चालु झाला असून ट्रक टार्मिनल मध्ये आता ट्रक थांबवन कठीण झाल आहे. यामुळे वाहतूकदारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असल्याचे म्हटले आहे.
नाशिक शहरातील वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी नाशिक शहरातील चारही बाजूने ट्रक टर्मिनल विकसित करावे अशी संघटनेची अनेक दिवसांपासूनची मागणी असून त्यासाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहे. नाशिक शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी मध्य प्रदेशातील इंदोरच्या धरतीवर सारथी सुविधा केंद्र विकसित होणे अपेक्षित असताना कुठलीही दूरदृष्टी न ठेवता बस डेपो करण्याचा घाट घातला जात आहे. वास्तविक महानगरपालिकेने स्वतंत्र ठिकाणी ट्रक टर्मिनल अगोदर विकसित करून देण्याचा दिलेला शब्द अगोदर पूर्ण करायला हवा होता त्यानंतरच हे काम सुरू करणे अपेक्षित होते. मात्र महापालिकेकडून दिशाभूल केली जात असल्याचे दिसत असल्याचे म्हटले आहे.
आडगाव येथील ट्रक टर्मिनल मध्ये बस डेपोचे काम सुरू असल्याने सध्या वाहतूकदारांना आपली वाहने उभी करण्यास कुठेही जागा शिल्लक नाही. जी थोडी जागा शिल्लक होती त्या जागेत श्वान निर्बीजीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.म्हणजे जाणून बुजून त्रास दिल्या सारखे करत आहे. बस डेपोचे दगड माती रस्त्यात टाकून उर्वरित जागा पण वापरता येत नाही. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे येथे प्रचंड प्रमाणामध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहतूकदारांची प्रचंड अशी गैरसोय होत आहे. या गैरसोईमुळे बाहेरून येणाऱ्या वाहतूकदारामध्ये नाशिक शहराची प्रतिमा अधिक मलीन होत आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच चार्जिंग बस डेपोचे काम बंद न केल्यास कायदेशीर उच्चन्यायालयात दाद मागन्याच संघटनेने ठरविले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल मध्ये चार्जिंग बस डेपोचे काम त्वरित थांबवावे. ट्रक टर्मिनल मध्ये सुविधा उपलब्ध करून द्याव्या.ट्रक टर्मिनल मधून श्र्वान निर्बीजीकरण थांबवावे. बंद जकात नाके ट्रक साठी पार्किंग म्हणून उपलब्ध करून द्यावे. शहरातील वाहून तळ (टेम्पो स्टँड) कायम करण्यात यावे.
या प्रमुख पाच मागण्या केल्या आहे. या मागण्यांचा सकारात्मकपणे विचार करावा. अन्यथा पुढील पंधरा दिवसात नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने नाशिक महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे.