इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढताहेत. अल्पवयीन मुलींपासून अगदी ज्येष्ठ महिलेपर्यंत कुणीही सुरक्षित नसल्याचे चित्र देशभर आहे. अशात मध्य प्रदेशातील एका संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मनोरुग्ण असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून देण्याच्या या घटनेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य प्रदेशातील उज्जैन येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर सापडली. तिच्यावर बलात्कार करून तिला शहरातील दांडी आश्रमाजवळ फेकून देण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला गेला. याप्रकरणी पोलिसांनी आता कारवाई केली असून संबंधित आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. तर, तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एवढेच नव्हे तर संबंधित पीडिता मानसिक रुग्ण असल्याचेही समोर आले आहे. अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव भारत सोनी आहे. आज घटनास्थळी आरोपीला नेण्यात आलं होते. यावेळी तो पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, पोलिसांनी त्याला तत्काळ पकडले. या धडपडीत भारत सोनीला दुखापत झाली. त्यामुळे त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले होते. तो सध्या बरा आहे. तर पीडिता मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील असून पोलिसांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे.
पोलिसांनी घेतली हाती मोहीम
उज्जैनमधील या घटनेनंतर पोलिस सतर्क झाले आहेत. यासंदर्भात अधिक सांगताना पोलिस अधीक्षक सचिन शर्मा म्हणाले,‘आम्ही आरोपींना गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी घेऊन जात होतो. त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असून तो जखमी झाला आहे. आमचे पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. आम्ही उज्जैनमधील सर्व ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षा चालकांचे चारित्र्य पडताळणी करणार आहोत.’