नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन नाशिकने नीट घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी व विद्यार्थ्याना न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली वराष्ट्रपतींना जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक मार्फत निवेदन देऊन NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी केली.
देशभरात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशा करिता घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला हा निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२९ गुण मिळाले आहेत. यंदा देशात २४ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५ लाख ४७ हजार ३६ विद्यार्थी आणि ७ लाख ६९ हजार २२२ विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत. यातील खुल्या गटातून ३ लाख ३३ हजार ९३२, ओबीसीतून ६ लाख १८ हजार ८९०, एससीतून १ लाख ७८ हजार ७३८, एसटी तून ६८ हजार ४७९ आणि इडबल्यूएस मधून १ लाख १६ हजार २२९ विद्यार्थी पात्र ठरले आहे. देशातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या शासकीय आणि खाजगी अशा एकूण ५४९ महाविद्यालयाच्या ७८ हजार ३३ जागांसाठी प्रवेश दिला जातो. मात्र परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांमुळे उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगले आहे.
NTA ( नॅशनल टेस्टिंग इजन्सी) ला यावर प्रश्न विचारले असता NTA ने केलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाहीत. ते या समस्येचे विश्वास बसेल असे स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरलेले आहे. NEET परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप झाला परंतु NTA ने तेव्हा देखील नकार दिला होता.
या सगळ्या घटना तसेच त्याबद्दल NTA मार्फत दिल्या गेलेल्या माहितीत मोठ्या प्रमाणात असलेली विसंगती बघता या संबंधी NTA द्वारा एक मोठा घोटाळा झाला असल्याचा संशय घेण्याचे पुरेसे पुरावे आहेत. NEET परीक्षेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच, एआयएसएफने स्पष्टपणे सांगितले होते की असे केंद्रीकृत मॉडेल विद्यार्थ्यांचे भविष्य अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाच्या केंद्रीकरणामुळे संस्थांची स्वायत्तता संपुष्टात आली आहे आणि खाजगी कोचिंग क्लासेस वाढली आहे. NEET UG ने विविधतेला नकार दिल्याने खाजगी कोचिंग सम्राटांच्या नफ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे, AISF(ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन)NEET पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करत आहे. यामुळे पालकांवर पडत असलेला आर्थिक दबाव देखील गंभीर चिंतेची बाब आहे.
AISF ने सध्याच्या घोटाळ्याची त्वरित चौकशी करण्याची आणि विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चिंता दूर करण्याची मागणी केली आहे. संस्थात्मक चुका दुरुस्त करून NEET परिक्षेलाच बरखास्त करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली पाहिजेत अशी एआयएसएफ ची मागणी आहे. या आंदोलनावेळी राज्याध्यक्ष कॉ. विराज देवांग, राज्यसहसचिव प्राजक्ता कापडणे, शहराध्यक्ष कैवल्य चंद्रात्रे, राज्यकाऊन्सिल सदस्य तल्हा शेख, लक्षिता देवांग, प्रणव काथवटे, अंकित यादव, ओम हिरे, साक्षी लोखंडे, राहुल भुजबळ, रोहीत काथवटे, रोहित खारोडे, विनायक संत, तन्मय देवरे, देविका शिंदे सहित इतर विद्यार्थी उपस्थित होते.