नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात घरगुती वापरात वीज चोरीचे प्रकार वाढले आहे. थकित वसूलीसाठी वीज पुरवठा खंडीत करूनही ग्राहकांकडून परस्पर जोडणी करून घेत चोरीछुपी वीज चोरी केली जात आहे. पेठरोड भागात महावितरणने केलेल्या छापेमारीत हा प्रकार समोर आला असून, वीज कंपनीच्या वतीने पोलीसात धाव घेण्यात आली आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द विद्यूत कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दशरथ बन्सी घुले,दीपक दिलीप खलसे (रा.दोघे फुलेनगर,पेठरोड), प्रमिला बापुराव शार्दुल व पुंडलीक शंकर पवार (रा. दत्तनगर,पेठरोड) अशी वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. थकीत वसूलीसाठी महावितरणच्या वतीने गेल्या फेब्रुवारी महिन्यात संबधीताच्या घरगुती वापराचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. चार महिने उलटूनही संबधीतांनी वीज बिलाचा भरणा न केल्याने पथकाने पाहणी केली असता वीज चोरीचा प्रकार समोर आला. सदर ग्राहक परिसरातील लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून वीजेची चोरी करतांना मिळून आले. संबधीतांनी सुमारे २ हजार ४०९ युनिट वीजेची चोरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून याप्रकरणी कंपनीच्या जुईली सालकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरचे गुन्हे पंचवटी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत.