नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मदतीच्या बहाण्याने एटीएमची अदलाबदल करीत भामट्यांनी शिक्षीकेच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत मागे उभे राहून बघितलेल्या पिनकोडचा वापर करून भामट्यांनी ३० हजार रूपयांची रोकड परस्पर काढून घेतली असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुसया निंबा चव्हाण (रा. विनायकनगर,दिंडोरीरोड) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. चव्हाण बुधवारी (दि.१२) दिंडोरीरोडवरील आकाश पेट्रोल पंप परिसरात असलेल्या एटीएम बुथ मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. सायंकाळच्या सुमारास त्या अॅक्सीस बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढत असतांना पाठीमागे उभ्या असलेल्या तरूणाने मदतीचा बहाणा करून ही फसवणुक केली. पैसे काढून देत भामट्याने हातचलाखीने एटीएम कार्डची आदलाबदल केली. हा प्रकार रात्री उघडकीस आला.
रात्रीच्या सुमारास मोबाईलवर तीस हजार रूपये परस्पर काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाल्याने चव्हाण यांनी एटीएम कार्डची पाहणी केली असता भामट्यांने पैसे काढतांना पाठीमागे उभे राहून नंतर मदतीचा बहाणा करून पिनकोड नंबरच्या माध्यमातून पैसे काढल्याचे समोर आले. चव्हाण यांनी तात्काळ पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक हाके करीत आहेत.