इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभेच्या दोनशे ते सव्वादोनशे जागा लढण्याची घोषणा करण्यात आली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या मनसेच्या राज्यव्यापी बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मराठी माणसाने मतदान केले नसल्याचे राज यांनी सांगितले. विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी असल्याची माहिती त्यांनी दिली. मी कोणाकडे जागा मागणार नसल्याचेही सांगताना राज यांनी महायुतीसोबत जाणार की नाही? हे स्पष्ट केले नाही.
मनसेच्या वतीने तूर्त स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्वच जागांवर तयारी करण्याचे आदेश राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. मतदार संघनिहाय आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती राज्यातील मतदार संघाचा आढावा घेणार आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीमध्ये दिल्या. युती किंवा आघाडीबाबत पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊ नये, असे त्यांनी सांगितले.