इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला. शेकडोंचे जीव गेले. पण या पावसाने शेतकऱ्यांचे आणि जलसाठ्याचे भले होत नसते, हेच खरे. कारण एवढे होऊनही महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर होणार आहेत. सरकार लवकरच या संदर्भात घोषणा करणार आहे.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या ४२ तालुक्यांना अवर्षणग्रस्त ठरविण्यात आले आहे. मदत व पुनर्वसन विभागाने एक सर्वेक्षण केले असून त्यानुसार मोठ्या प्रमाणात झळ बसलेल्या ४० तालुक्यांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील संभाजीनगर, सोयगाव, जालन्यातील जालना, भोकरदन, बदनापूर, अंबड, मंठा, बीडमधील वडवणी, धारूर, अंबेजोगाई, लातूरमधील रेणापूर, धाराशीवमधील वाशी, धाराशीव, लोहारा, नंदूरबारमधील नंदूरबार, धुळ्यातील शिंदखेडा, जळगावमधील चाळीसगाव, बुलडाण्यातील बुलडाणा, लोणार, नाशिकमधील मालेगाव, सिन्नर, येवला, पुण्यातील शिरूर, मुळशी, पौंड, दौंड. पुरंदर, सासवड, वेल्हा, बारामती, इंदापूर, सोलापूरमधील करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला, साताऱ्यातील वाई, खंडाळा, कोल्हापूरमधील हातकणंगले, गडहिंग्लज, सांगलीतील शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा आणि मिरज या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
१२ टक्के कमी पाऊस
केंद्र सरकारच्या निकषांप्रमाणे सप्टेंबरमध्ये शास्त्रीय निकषांच्या कसोटीवर ४२ तालुके अपात्र ठरले आहेत. तत्पूर्वी, १९४ तालुक्यांमध्ये पावसाअभावी दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. यानुसार या तालुक्यांमध्ये माहिती भरण्यात आली आणि ४२ तालुके अपात्र ठरले. राज्यात यंदा सरासरीपेक्षा १२ टक्के पाऊस कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.