नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा, देवळा आणि जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतून चोरी गेलेल्या दुचाकींचा शोध घेण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक गुन्हे शाखेने धुळे जिल्ह्यातील सोनगीर आणि लामकानी परिसरात मोठी कारवाई केली आहे. यात प्रदीप भरत पाटील (लोणखेडी ता. साक्री) आणि मनोज पांडुरंग गायकवाड (लामकनी ता. धुळे) या दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे, तर प्रमुख आरोपी भूषण सुरेश मोहिते (रा. लोणखेडी ता. साक्री) याला कळवण पोलिसांनी अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण मोहिते हा मद्याच्या नशेत कळवण व बागलाण परिसरात येऊन बजाज प्लाटिना दुचाकी चोरी करत होता आणि त्या लोणखेडी येथील प्रदीप पाटील (भुरा) याला स्वस्तात विकत होता. या माहितीच्या आधारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने आरोपींच्या मोबाईल लोकेशनचा माग काढून लोणखेडी गावात मध्यरात्री सापळा रचून अटक केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक दत्ता कंभिरे, पो हवा प्रशांत पाटील, सुधाकर बागुल, योगेश शेवाळे, सुभाष चोपडा, दत्ता माळी, योगेश कोळी, हेमंत गलबले, प्रदीप बहिरम या अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश होता.
दोघा आरोपींना सटाणा पोलिसांनी कोठडीत घेतले असून, त्यांनी अजून काही गुन्हे केले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत, पो हवा शेवाळे, खैरनार तपास करीत आहेत.