बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे याचा झालेला पराभव जिव्हारी लागल्याने त्यांचे समर्थक पोपट मधुकर वायभसे (वय ३६) या तरुणाने ‘सोशल मीडिया’वर अलविदा अशी पोस्ट टाकून आत्महत्या केली. ही घटना चिंचेवाडी (ता.आष्टी) येथे घडली.
पंकजा यांच्या पराभवामुळे व्यथित होऊन नऊ तारखेला पांडुरंग सोनवणे (रा.डिघोळअंबा, ता.अंबाजोगाई) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आता चिंचेवाडीतील पोपट वायभसे याने गावातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री १२.१५ वाजता ही घटना उघडकीस आली. त्याअगोदर काही मिनिटे त्याने अलविदा अशी पोस्ट टाकली होती. पंकजा यांचा पराभव झाल्यानंतर पोपट तणावात होता. पंकजांच्या पराभवाबद्दल तो घरी सतत विचारणा करत होता. या तणावातून त्याने आत्महत्या केली.
यापूर्वी लातूर जिल्ह्यातील एका पंकजा समर्थकानेही आत्महत्या केली. पंकजा यांनी भावनिक आवाहन करूनही आत्महत्यांचे सत्र काही थांबत नाही.