इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदार संघातून सुनेत्रा या नुकत्याच पराभूत झाल्या. त्यामुळे त्यांची वर्णी राज्यसभेवर लावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेवर सस्पेन्स होता. तो आज संपला. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार गटाच्या अपात्रतेच्या याचिकेमुळे पटेल यांनी २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते दुसऱ्या जागेवर निवडून आले. चार वर्षे कार्यकाळ उरलेल्या पटेल यांच्या जुन्या जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यासाठी आता सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहे.
राज्यसभेच्या या जागेसाठी आमदारांच्या मतदानातून २५ जूनला निवडणूक होत आहे. सध्या महायुतीकडे २०० हून अधिक आमदारांचे पाठबळ असल्यामुळे त्यांचा उमेदवार विजयी होणार हे निश्चित आहे. दरम्यान, अजितदादा गटाचा लोकसभेत एक व राज्यसभेत एक असे दोन खासदार आहेत. पोटनिवडणूक जिंकल्यानंतर त्यांचे राज्यसभेत दोन खासदार होतील. उदयनराजेंसाठी अजितदादा गटाने साताऱ्याची जागा सोडली. उदयनराजे यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर ती जागा राष्ट्रवादीला मिळेल. अजितदादांनी सातारा जिल्ह्यातील नेत्याला तिथे उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर दादांचे राज्यसभेत तीन व लोकसभेत एक असे चार खासदार होतील. या बळावर केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदावर त्यांनी दावा केला आहे.